Suresh bhat kavita सुरेश भट मराठी कविता | Marathi Poem

Suresh bhat kavita सुरेश भट मराठी कविता | Marathi Poem

Suresh bhat kavita
Suresh bhat poem

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! Suresh bhat kavita तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच.सुरेश भट मराठी कविता साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून Suresh bhat kavita माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi Poem उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये Suresh bhat सुरेश भट मराठी कविता उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया Suresh bhat kavita Marathi Poem कडे.

🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


आज गोकुळात रंग खेळतो by Suresh bhat


आज गोकुळात रंग खेळतो हरी;
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी !

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढुनी खुशाल रंग टाकतो
रंगवून रंगुनी गुलाल फासतो
सांगते अजूनही तुला परोपरी !

सांग श्यामसुंदरास काय जाहले?
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले !
एकटीच वाचशील काय तू तरी !

त्या तिथे अनंगरंगरास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदंग मंजिर्‍यांत वाजला
हाय ! वाजली फिरून तीच बासरी !


🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


चल उठ रे मुकुंदा by Suresh bhat



चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली

मंदावला कधीचा गगनात शुक्रतारा
अन्‌ चोरपावलांनी आला पहाटवारा
गालांवरी उषेच्या आली हळूच लाली

घे आवरून आता स्वप्‍नांतला पसारा
बेचैन गोकुळाने केला तुझा पुकारा
तव गीत गात सारी ही पाखरे उडाली

तुज दूर हाक मारी कालिंदिचा किनारा
कुंजांतल्या फुलांनी केला तुला इशारा
तुज शोधण्यास वेडी राधा पुन्हा निघाली

🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


तुझ्या नभाला गडे किनारे by Suresh bhat


तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही !
तिथेच जाऊन वेच तारे अजून काही !

जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा !
खुली व्यथांची सताड दारे अजून काही !

तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही !

गडे मला सांग तूच माझीतुझी वदंता
विचारते गाव हे बिचारे अजून काही !

करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे अजून काही !

विझून माझी चिता युगे लोटली तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही !

🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺



दूर दूर चांदण्यात मी असाच by Suresh bhat


दूर दूर चांदण्यात मी असाच हिंडतो !
तारकांस हालचाल मी तुझी विचारतो !

वाटते कधी चुकून
भेटशील तू अजून
थांबतो पुन्हा मधून
अन्‌ उगीच सावल्यांत सैरभैर पाहतो !

चाललो असेच गात
ऐकते उदास रात
चंद्रमा झुरे नभात
अन्‌ इथे फुलाफुलांत मी तुलाच शोधतो !

वेड लागले जिवास
हे तुझे दिशांत भास
हा तुझा मनी सुवास
आपल्याच आसवांत मी वसंत ढाळतो

🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


मेंदीच्या पानांवर by Suresh bhat


मेंदीच्या पानांवर मन अजून झुलते ग
जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते ग

झुळझुळतो अंगणात तोच गार वारा ग
हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा ग

अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग
अजून तुझ्या डोळ्यांतिल मोठेपण कवळे ग


🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


हा असा चंद्र by Suresh bhat


हा असा चंद्र.. अशी रात फिरायासाठी !
तूच नाहीस इथे हात धरायासाठी !

चेहरा तो न इथे ही न फुलांची वस्ती !
राहिले कोण आता सांग झुरायासाठी?

कालचे तेच फिके रंग नकोसे झाले
दे तुझे ओठ नवा रंग भरायासाठी !

आडवी एक तिथे भिंत मनाची आली..
दार होतेच कुठे आत शिरायासाठी?

काय आगीत कधी आग जळाली होती?
लोक नेतील मला खोल पुरायासाठी !


🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


मग माझा जीव तुझ्या वाटेवर by Suresh bhat


मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल !
अन्‌ माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल !

मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्‍नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबर्‍यात अडखळेल !

विसरशील सर्व सर्व
आपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल !

सहज कधी तू घरात
लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल !

जेव्हा तू नाहशील,
दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल !

जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतुन गुणगुणेल !

मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुंद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल !


🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


दुभंगून जाता जाता by Suresh bhat


दुभंगून जाता जाता मी अभंग झालो !
चिराचिरा जुळला माझा; आत दंग झालो !

सल जुनेच सलता सलता सुखावून गेले !
अन्‌ हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले !
कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो !

किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो !
अन्‌ असाच वणवणताना मी मला मिळालो !
सर्व संग सुटले, माझा मीच संग झालो !

ज्ञानदेव लिहुनी गेले ओळओळ भाळी !
निमित्तास माझे गाणे, निमित्तास टाळी !
तरू काय? इंद्रायणीचा मी तरंग झालो !


🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


राहिले रे अजून श्वास किती by Suresh bhat



राहिले रे अजून श्वास किती?
जीवना, ही तुझी मिजास किती?

आजची रात खिन्‍न तार्‍यांची..
आजचा चंद्रही उदास किती?

मी कसे शब्द थोपवू माझे?
हिंडती सूर आसपास किती !

दु:ख माझे.. विरंगुळा त्यांचा..
मी करावे खुळे कयास किती?

ओळखीचे कुणीतरी गेले..
ओळखीचा इथे सुवास किती !

हे कसे प्रेम? या कशा आशा?
मी जपावे अजून भास किती?

सोबतीला जरी तुझी छाया..
मी करू पांगळा प्रवास किती?


🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


चांदण्यात फिरताना by Suresh bhat


चांदण्यात फिरताना माझा धरलास हात !
सखया रे, आवर ही सावर ही चांदरात !

निजलेल्या गावातुन
आले मी एकटीच;
दूर दिवे कळलावे
पडले मागे कधीच;
ह्या इथल्या तरूछाया पण सारे जाणतात !

सांग कशी तुजविनाच
पार करू पुनवपूर?
तुज वारा छळवादी
अन्‌ हे तारे फितूर !
श्वास तुझा मालकंस ! स्पर्श तुझा पारिजात !

🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺

Suresh bhat kavita सुरेश भट मराठी कविता तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही Suresh bhat kavita सुरेश भट मराठी कविता Marathi Poem आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !


1 टिप्पणी: