Mangesh padgaonkar poems मंगेश पाडगावकर कविता | Marathi kavita

Mangesh padgaonkar poems मंगेश पाडगावकर कविता | Marathi kavita

Mangesh padgaonkar poems in marathi
Mangesh padgaonkar kavita

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! Mangesh padgaonkar poems तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच.मंगेश पाडगावकर कविता साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून  Mangesh padgaonkar kavita माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये Mangesh padgaonkar poems उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया मंगेश पाडगावकर कविता कडे.

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


तु असतीस तर by Mangesh padgaonkar


तु असतीस तर झाले असते
सखे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातुन
एक दिवाने नवथर गाणे

बकुळुच्या फुलापरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
आणि रंगानी केले असते
क्षितिजावर खिन्न रितेपण

पसरली असती छायांनी
चरणातली म्रूद्शामल मखमल
आणि शुक्रांनी केले असते
स्वागत अपुले हसुन मिश्किल

तु असतीस तर झाले असते
आहे त्याहुन हे जग सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धुसर अंतर …

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


चिऊताई दार उघड by Mangesh padgaonkar


दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !

दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील ?

वारा आत यायलाच हवा!
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !

दार उघड,
दार उघड,
चिऊताई चिऊताई, दार उघड !

फुलं जशी असतात,
तसे काटेही असतात.
सरळ मार्ग असतो,
तसे फाटेही असतात !

गाणा-या मैना असतात.
पांढरे शुभ्र बगळे असतात.
कधी कधी कर्कश्य काळे
कावळेच फ़क्त सगळे असतात .

कावळ्याचे डावपेच पक्के असतील.
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील .

तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं.
आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं .

दार उघड
दार उघड चिऊताई,
चिऊताई दार उघड !

सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं?
आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं परकं !

मोर धुंद नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?

तुलना करित बसायचं नसतं गं
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !

प्रत्येकाच्या आत
फुलणारं फूल असतं.
प्रत्येकाच्या आत
खेळणारं मूल असतं !

फुलणा-या फुलासाठी,
खेळणा-या मुलासाठी ,

दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !

निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही.
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही !

आपणच आपला मग
द्वेष करू लागतो
आपल्याच अंधाराने
आपलं मन भरू लागतो

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं.
तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं .

चिऊताई चिऊताई
तुला काहीच कळलं नाही .

तुझं दार बंद होतं.
डोळे असून अंध होतं .

बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल ?

दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !

मंगेश पाडगावकर


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


माणूस केलंत तुम्ही मला by Mangesh padgaonkar


इतकं दिलंत,
इतकं दिलंत
इतकं दिलंत तुम्ही मला!
खरं सांगतो,
माणूस केलंत तुम्ही मला!

पावसाळ्यात तर
वर्षावाला मिती नव्हती;
माझी ओंजळ
कधीसुद्धा रिती नव्हती!

पण कधी उन्हाळ्याच्या वणव्यातही
तुमचं प्रेम सरी झाल्या,
मला शोधत घरी आल्या!
इतकं दिलंत….

तसा मी माझ्यातच गुंग होतो,
स्वतःभोवती फिरण्यातच दंग होतो,
मीच माझ्या खुशीचा रंग होतो

तरी तुम्ही मानून घेतलत,
माझं मन जानून घेतलत!
इतकं दिलंत…..

भिऊन माझ्या सावलीला
पळत होतो,
नको त्या वळणावर वळत होतो,
एकलेपणात हताश होऊन
जळत होतो….

तुम्ही मला भिजवलंत,
हिरवगार रूजवलंत !
इतकं दिलंत….

तुमचं प्रेम स्मरून इथून जाताना
तुमच्या मायेत
चिंब भिजून न्हाताना,
तुमच्या समोर
उभं राहून गाताना,
मन असं भरून येतं
डोळ्यातून झरून येतं !

डोळ्यात जेव्हा आसवं असतात
तेव्हाच माणसं माणसं असतात !

इतकं दिलंत,
इतकं दिलंत
इतकं दिलंत तुम्ही मला!
खरं सांगतो,
माणूस केलंत तुम्ही मला!

मंगेश पाडगावकर


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


छोरी by Mangesh padgaonkar


थबकुनी थोडी
वळुनी पुढे घाईनें
प्रौढ नि बुटक्या झाडाजवळुन जास्वंदीच्या
जाते वाट पुढे ही शाळेपाशी

शाळा:
चौकॊनी खॊकेच ४ खिडक्यांचे
रंग सफेद चुन्याचा
छप्पर लाल नळ्यांचे…

भल्या पहाटे (आठ वाजता)
झाडांचीही नसते जेंव्हा झोप संपली
सुरु व्हायची शाळा …….
पहिली घंटा….
दुसरी घंटा……..
सुरु प्रार्थना आणि नंतर:
“नमन तुला गणराया
बुद्धी जाग्रुती देई मुलां या”
….एक जांभई.

कर्कष्य आवाजाने नंतर हुकुम व्हायचा:
“काढा पाट्या
कुठे उजळणी
चला दाखवा…..”

…माझी पाटी कोरी…
हात पुढे….
भिंगे खवचट चष्म्याची रोखुनिया बघती
वेत सपासप माझ्या हातांवरती…

किती वेळ रडलो नाही ठाऊक
आली अवचीत जाग स्पर्शता हात मऊ
मी पाहिले शेजारी;

नविन कोणी मुलगी
केस भुरे सोनेरी
निळसर डोळे…….

मी विचारले तिज, “नांव काय तुझे….”
ती खट्याळ हसली आणि म्हणाली
“नांव? छोरी ….हात पुढे कर.”
आणि नजर खॊडकर
आणिक माझ्या हातावरती …दुखर्या हातावरती .
चिमणिच्या नाजुक दातांनी तोडियली
फोड एक कैरीची….

फोड एक कैरीची;
अजुन ताजी
जिभेवर जिची आंबट गोडी,
भुरभुरती सोनेरी कुंतल,

अजुन घेते टिपुनी वेदना
नजर तिची ती निळी खॊडकर…..
गिरकी घेते मनीं कलाबुत तिच्या स्वरांची;
“नांव? छोरी…. हात पुढे कर”

मंगेश पाडगांवकर.


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


चेहरा by Mangesh padgaonkar


त्या माणसाला चेहराच नव्हता!

अचानक पण एक आश्चर्य घडलं
बिनचेहऱ्याचा तो माणुस मैफिलित
गाणं ऐकु लागला
तेंव्हा त्याला चेहरा आला

त्याचे डोळे, त्याचे ओठ
गाण्याला दाद देउ लागले,
गाण्याला दाद देता देता
त्याचा चेहरा उजळला!

आता फक्त ए कच प्रश्न आहे
उजळलेल्या चेहऱ्याचा तो माणुस
घरी जाईल तेंव्हा
त्याच्या घरची माणसं
त्याला ऒळखणार नाहित

कारण त्याचा चेहरा
त्यांनी कधी पाहिलाच नव्हता..

मंगेश पाडगांवकर…

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


चेहरा 2 by Mangesh padgaonkar


आगगाडीच्या फलाटावर
शेकडो पायांची ,
बिन चेह~याची गर्दी;
गलका असंबद्ध आवाजांचा
धावपळ, रेटारेटी संवेदना शुन्य…….

आणि ते लहान मुल केविलवाणे,
त्याची आई हरवलेली आंधळ्या गर्दीत,
ओक्साबोक्शी रडणारे,
असंबद्ध आवाजांच्या पुरात बुडणारे…..

हळवा होतो माझा जीव,
मी जातो त्याच्या जवळ,
मला दिसतो त्याचा चेहरा;

आणि मला आश्चर्याचा धक्काच बसतो:
तो चेहरा माझाच असतो!

मंगेश पाडगांवकर

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


अशी पाखरे येती by Mangesh padgaonkar


अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती ॥ ध्रु ॥

चंद्र कोवळा, पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनि, जाय उजळुनी, काळोखाच्या राती ॥ १ ॥

फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर, परी निरंतर, गंधित झाली माती ॥ २ ॥

हात एक तो हळु थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी, अजून जळती वाती ॥ ३ ॥

कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती ॥ ४ ॥

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


अजुन by Mangesh padgaonkar


रात्रीं झडलेल्या धारांची

ओल अजून हि अंधारावर

निजेंत अजुनी खांब विजेचा

भुरकी गुंगी अन तारांवर

भित्र्या चिमणीपरी, ढगांच्या

वळचणींत मिणमिणे चांदणी

मळक्या कांचेवरी धुक्याच्या

वाऱ्याची उमटली पापणी

कौलावरुनी थेंब ओघळे

हळुच, सांचल्या पाण्यावरतीं;

थेंब ध्वनीचा हवेंत झुलतो

गिरकी घेऊन टांचेवरतीं

गहिऱ्या ओल्या कुंदपणांतच

गुरफटलेली अजुन स्तब्धता

कबूतराच्या पंखापरि अन

राखी…कबरी ही अंधुकता

अजून आहे रात्र थोडिशी,

असेल अधिकहि…कुणि सांगावें?

अर्धी जाग नि अर्धी निद्रा

इथेंच अल्गद असें तरावें!

– मंगेश पाडगांवकर

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


एकामेकांशिवाय by Mangesh padgaonkar


आपण असतो उभे एकमेकांजवळ एकमेकांशिवाय.
तरीही ओळखतो भुकेचा वास.इच्छांचे वळसे.
हिशोब करीत करीत जपुनच घसरतो.
गरजांच्या मिठयांनी गरजाच प्रसवतो .
आणि यातले नसते काहिच आपल्या स्वाधीन .
एकमेकांजवळ. एकमेकांना . एकमेकाने.एकमेकांहून.
एकमेकांआत : एकमेकांशिवाय .

असेच बसतात प्रत्यय स्वार होऊन सगळे उपाशी भाषेवर :
आणि असा चालतो आशयाचा प्रवास.
एकदाच अवलिया भाषेच्या देशातुन परागंदा होतो :
अज्ञात काळोखांतला अचानक पाऊस शब्दहीन एकांतात फांदि होऊन पितो:
त्याला आपण पुरतो : दैनिक पेपरांच्या डोंगर रद्दीखाली .
पों पों पीं पीं ट्रिंग ट्रिंग खट खट हैलो हैलो एकमेकांजवळ .एकमेकाना.एकमेकाहून.एकमेकांआत : एकमेकांशिवाय .

मंगेश पाडगांवकर

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


जन्म by Mangesh padgaonkar


मी न घेतले, तरि मिळाले
कधीच मी जे घेऊ नये.
तुही दिल्याविण दिलेस सारे
कधी कुणी जे देऊ नये .

पिचलेल्या जन्मातुन रुजले
विजभारले सुर नवे.
ऐकण्यात जे व्यथेत मिटले
लोचन राधेचेच हवे.

श्याम घनांची उतट अनावर
कासाविस बरसात अशी.
काळोखाच्या यमुनेकाठी
धडधडणारी हवी पिशी.

मलाच नकळत माझे डोळे
यमुनेतुन वाहत जाती .
अंधपणातच चाचपतो मी
फुटल्या जन्माची माती.

दान तुझे हे घेण्यासाठी
फुटल्यावाचुन हात कुठे ???
या भरलेल्या रित्या ओंजळीत
हिरवा हिरवा जन्म फुटे.

मंगेश पाडगांवकर

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


मी फुले ही वेचताना सांज झाली by Mangesh padgaonkar


मी फुले ही वेचताना सांज झाली
दूर रानातून त्याची हाक आली

थांबली भांबावुनी ही सर्व झाडे
सावल्यांच्या भारलेल्या हालचाली

कापर्‍या तंद्रीत कोणी स्वप्नपक्षी
हालल्या भासापरी रानी मशाली

टाकुनी सारी फुले ही धावले मी
चांदण्याचा थेंब माझ्या एक गाली

मंगेश पाडगांवकर

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


कुणी मज पाहिले नाही नजर चुकवून जाताना by Mangesh padgaonkar


कुणी मज पाहिले नाही नजर चुकवून जाताना
कुणी मज ऐकिले नाही मी गीत गाताना

किती त्या चांदण्या रात्री, किती भेटी, उसासे ते
मलाही समजले नाही मला समजून घेताना

तुझ्या डोळ्यांत बघताना मला मी विसरुनी गेले
कुणी मज छेडीले नाही तशी बेहोष होताना

क्षणांची लाजर्‍या सार्‍या तुझ्यापाशी फुले झाली
कुणीही जाणिले नाही असे उमलून येताना

“गझल” मंगेश पाडगांवकर

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


खिन्न या वाटा दूर पळणार्‍या by Mangesh padgaonkar


खिन्न या वाटा दूर पळणार्‍या

या स्मृती जीव छळणार्‍या

लाडक्या शपथा, लाजरी वचने
पाकळ्या त्यांच्या आज गळणार्‍या

रात्र वैरीण ही सात जन्मांची
आणि या उल्का तोल ढळणार्‍या

चांदण्याकाठी धुंद त्या भेटी
या व्यथा उरल्या आज जळणार्‍या

“गझल” मंगेश पाडगांवकर

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


भाव माझ्या अंतरीचे एकदा कळतील सारे by Mangesh padgaonkar


भाव माझ्या अंतरीचे एकदा कळतील सारे
दूरच्या रानात तेव्हा गीत हे गातील वारे

धूर्त सार्‍या माणसांची जाहली बंद जेव्हा दुकाने
त्या क्षणी माझ्या घराची बंद होती सर्व दारे

पिंजर्‍याची चीड होती, पंख हे आयुष्य माझे
या नभाच्या आशयाला शब्द माझे लाख तारे

पावसाला हाक जेव्हा मोर हे घालीत आले
लाभले प्रितिस माझ्या रंगवेडे हे पिसारे

वाहुनी नेतील लाटा मौन माझे गूढ रात्रीं
एकदा नसतील तेव्हा सागराला या किनारे

– “गझल” मंगेश पाडगांवकर

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला by Mangesh padgaonkar


सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला ?

आता आभाळ भेटले रे
अंग फुलांनी पेटले रे
पहा कसे ऐकू येती श्वास माझे मला

फांदी झोक्याने हालते रे
वाटे स्वप्नी मी चालते रे
मिटले मी माझे डोळे, हात हाती दिला

जुने आधार सुटले रे
तुझ्या मिठीत मिटले रे
सांभाळ तू बावरल्या वेड्या तुझ्या फुला

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


सांगा कसं जगायचं by Mangesh padgaonkar


सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

– मंगेश पाडगांवकर

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


अफाट आकाश by Mangesh padgaonkar


अफाट आकाश
हिरवी धरती
पुनवेची रात
सागर-भरती
पाचूंची लकेर
कुरणाच्या ओठी
प्रकाशाचा गर्भ
जलवंती-पोटी
अखंड नूतन मला ही धरित्री
आनंदयात्री मी आनंदयात्री

मेघांच्या उत्सवीं
जाहलों उन्मन
दवांत तीर्थांचे
घेतलें दर्शन
दूर क्षितिजाची
निळी भुलावण
पाशांविण मला
ठेवी खिळवून
अक्षयवीणाच घुमे
माझ्या गात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री

हलके कढून
कंटक पायींचे
स्वरांत विणिले
सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा
केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें
पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें
अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री.

– मंगेश पाडगांवकर

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺

Mangesh padgaonkar poems मंगेश पाडगावकर कविता तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही Mangesh padgaonkar poems मराठी कविता आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !

No comments:

Post a comment