बहिणाबाई चौधरी यांच्या कविता | Bahinabai chowdhary Marathi Kavita | Marathi Poem
Bahinabai chowdhary kavita |
नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! बहिणाबाई चौधरी यांच्या कविता तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच. Bahinabai chowdhary Marathi Kavita साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून बहिणाबाई चौधरी यांच्या कविता माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi Poem उपलब्ध करून देत असतो.
मित्रांनो,या पोस्टमध्ये बहिणाबाई चौधरी यांच्या कविता उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया Bahinabai chowdhary Marathi Kavita कडे.
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
उगवले नारायण by बहिणाबाई चौधरी
उगवले नारायण, उगवले गगनांत
प्रभा सोनीयाची फांके उन्हें आली अंगणात ll १ll
उन्हें आली अंगणात, उन्हें आली ओटीवर
सोनपावलांनी देवा, उजळले माझे घर ll २ll
उजळले माझे घर, झळाळले ग, कळस
डुलुं लागे आनंदाने वृंदावनींची तुळस ll ३ll
वृंदावनींची तुळस, दिसे हिरवी अंजिरी
वारियाच्या झुळुकिने हंसे मंजिरी मंजिरी ll ४ll
हंसे मंजिरी मंजिरी, प्राजक्ताच्या पावलाशीं
सडा फुलांचा घालतो, मोती-पोवळ्याच्या राशी ll ५ll
मोती-पोवळ्याच्या राशी, वैभवाला नाही अंत
सुख वेचितें संसारी, माउली मी भाग्यवंत ll ६ll
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
कशाला काय म्हणूं नही ? by बहिणाबाई चौधरी
बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनूं नहीं
हरी नामाईना बोले
त्याले तोंड म्हनूं नहीं
नही वार्यानं हाललं
त्याले पान म्हनूं नहीं
नहीं ऐके हरिनाम
त्याले कान म्हनूं नहीं
पाटा येहेरीवांचून
त्याले मया म्हनूं नहीं
नहीं देवाचं दर्सन
त्याले डोया म्हनूं नहीं
निजवते भुक्या पोटीं
तिले रात म्हनूं नहीं
आंखडला दानासाठीं
त्याले हात म्हनूं नहीं
ज्याच्या मधीं नही पानी
त्याले हाय म्हनूं नहीं
धांवा ऐकून आडला
त्याले पाय म्हनूं नहीं
येहेरींतून ये रीती
तिले मोट म्हनूं नहीं
केली सोताची भरती
त्याले पोट म्हनूं नहीं
नहीं वळखला कान्हा
तीले गाय म्हनूं नहीं
जीले नहीं फुटे पान्हा
तिले माय म्हनूं नहीं
अरे, वाटच्या दोरीले
कधीं साप म्हनूं नहीं
इके पोटाच्या पोरीले
त्याले बाप म्हनूं नहीं
दुधावर आली बुरी
तिले साय म्हनूं नहीं
जिची माया गेली सरी
तिले माय म्हनूं नहीं
इमानाले इसरला
त्याले नेक म्हनूं नहीं
जल्मदात्याले भोंवला
त्याले लेक म्हनूं नहीं
ज्याच्यामधीं नहीं भाव
त्याले भक्ती म्हनूं नहीं
त्याच्यामधीं नहीं चेव
त्याले शक्ती म्हनूं नहीं...
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
अरे खोप्यामधी खोपा by बहिणाबाई चौधरी
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला
पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
राजा शेतकरी by बहिणाबाई चौधरी
जसा बोल्यले कर्रय तसा कामाले करारी सभावानं मन मोका असोद्याचा शेतकरी
कारामधी रोखठोक नही उसनउधारी दोन देये दोन घेये असा राजा शेतकरी
असा राजा शेतकरी चालला रे आढवनी देखा त्याच्या पायाखाले काटे गेले वाकसनी
बोरू चाले कुरुकुरु तश्या पाट्या पेनाशिली पोर्हं निंघाले शिक्याले कधीमधी टांगटोली
हाया समोरची शाया पोर्हं शायीतून आले हुंदडत हायाकडे ढोरं पान्यावर गेले
अरे असोद्याची शाया पोर्हं शंबर शंबर शायामधी भारी शाया तिचा पह्यला नंबर
इमानानं शिकाळती तठी 'आबा' मायबाप देती अवघ्याले इद्या भरीभरीसनी माप
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
अरे रडता रडता by बहिणाबाई चौधरी
अरे रडता रडता डोळे भरले भरले
आसू सरले सरले आता हुंदके उरले
आसू सरले सरले माझा मलेच इसावा
असा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा
सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली
झाड़ गेलं निंधीसनी माघं सावली उराली
देव गेले देवा घरी आठी ठेयीसनी ठेवा
डोळ्या पुढे दोन लाल रडू नको माझ्या जीवा
रडू नको माझ्या जीवा तुले रड्याचीरे सवं
आसू हसावं रे जरा त्यात संसाराची चव
कुकू पुसलं पुसलं आता उरलं गोंधन
तेच देइल देइल नशिबले आवतन
जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतूत
तुटे मंगयसुतर उरे गयाची शपत
नका नका आया बाया नका करू माझी कीव
झालं माझं समाधान आता माझा मले जिव
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
कशाले काय म्हनू नही by बहिणाबाई चौधरी
बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हनू नही, हरी नामा ना बोले त्याले तोंड म्हनू नही
नही वाऱ्याने हालल त्याले पान म्हनू नही, नही ऐके हरीनाम त्याले कान म्हनू नही
पाट येहरीवाचून त्याले मया म्हनू नही, नही देवाच दर्सन त्याले डोया म्हनू नही
निजवते भुक्या पोटी तिले रात म्हनू नही, आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही
ज्याच्यामाधी नही पानी त्याले हाय म्हनू नही, धावा ऐकून आडला त्याले पाय म्हनू नही
नही वळखळा कान्हा तिले गाय म्हनू नही, जिले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही
अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हनू नही, एके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हनू नही
दुधावर आली बुरी तिले साय म्हनू नही, जिची माया गेली सरी तिले माय म्हनू नही
इमानाले इसरला त्याले नेक म्हनू नही, जलमदात्याले भोवला त्याले लेक म्हनू नही
ज्याच्यामधी नही भाव त्याले भक्ती म्हनू नही, ज्याच्यामध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हनू नही
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
माहेर by बहिणाबाई चौधरी
बापाजीच्या हायलींत येती शेट शेतकरी
दारी खेटराची रास घरीं भरली कचेरी
गांवामधी दबदबा बाप महाजन माझा
त्याचा कांटेतोल न्याव जसा गांवमधीं राजा
माय भीमाई माऊली जशी आंब्याची साऊली
आम्हाईले केलं गार सोता उन्हांत तावली
तुझे भाऊ देवा घरीं नहीं मायबाप तुले
तुले कशाचं माहेर लागे कुलूप दाराले
भाऊ 'घमा' गाये घाम 'गना' भगत गनांत
'धना' माझा लिखनार गेला शिक्याले धुयांत
आम्ही बहीनी 'आह्यला' 'सीता, तुयसा, बहीना'
देल्या आशीलाचे घरीं सगेसाई मोतीदाना
लागे पायाले चटके रस्ता तापीसनी लाल
माझ्या माहेरची वाट माले वाटे मखमल
जीव व्हती लाही लाही चैत्र वैसागाचं ऊन
पाय पडतां 'लौकींत' शीन जातो निंघीसन
तापीवानी नही थडी जरी वाहे थोडी थोडी
पानी 'लौकी'चं नित्तय त्याले अम्रीताची गोडी
माहेरून ये निरोप सांगे कानामंधि वारा
माझ्या माहेराच्या खेपा 'लौकी' नदीले विचारा !
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
घरोट by बहिणाबाई चौधरी
देवा, घरोट घरोट तुझ्या मनांतली गोट
सर्व्या दुनियेचं पोट घरीं कर्माचा मरोट
अरे, घरोट घरोट वानी बाम्हनाचं जातं,
कसा घरघर वाजे त्याले म्हनवा घरोट
अरे, जोडतां तोडलं त्याले तानं म्हनू नहीं
ज्याच्यांतून येतं पीठ त्याले जातं म्हनूं नहीं
कसा घरोट घरोट माझा वाजे घरघर
घरघरींतून माले माले ऐकूं येतो सूर
त्यांत आहे घरघर येड्या, आपल्या घराची
अरे, आहे घरघर त्यांत भर्ल्या आभायाची
आतां घरोटा घरोटा दयन मांडलं नीट
अरे, घंट्या भरामधीं कर त्याचं आतां पीठ
चाल घरोटा घरोटा तुझी चाले घरघर
तुझ्या घरघरींतून पीठ गये भरभर
जशी तुझी रे घरोटा पाऊ फिरे गरगर
तसं दुधावानी पीठ पडतं रे भूईवर
अरे, घरोटा घरोटा तुझ्या माकनीची आस
माझ्या एका हातीं खुटा दुज्या हातीं देते घांस
अरे, घरोटा घरोटा घांस माझा जवारीचा
तुले सनासुदी गहूं कधीं देते बाजरीचा
माझा घरोट घरोट दोन दाढा दोन व्होट
दाने खाये मूठ मूठ त्याच्यातून गये पीठ
अरे, घरोटा घरोटा माझे दुखतां रे हात
तसं संसाराचं गानं माझं बसते मी गात
अरे, घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठी
तसं तसं माझं गानं पोटातून येतं व्होटीं
दाने दयतां दयतां जशी घामानं मी भिजे
तुझी घरोटा घरोटा तशी पाऊ तुझी झिजे
झिजिसनी झिजीसनी झाला संगमरवरी
बापा, तुले टाकलाये टकारीन आली दारीं !
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
धरीत्रीच्या कुशीमधीं by बहिणाबाई चौधरी
धरीत्रीच्या कुशीमधीं बीयबियानं निजलीं
व-हे पसरली माती जशी शाल पांघरली
बीय टरारे भुईत सर्वे कोंब आले व-हे
गह्यरलं शेत जसं अंगावरतीं शहारे
ऊन वा-याशीं खेयतां एका एका कोंबांतून
पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन
टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनीं
जसे करती कारोन्या होऊं दे रे आबादानी
दिसामासा व्हये वाढ रोप झाली आतां मोठी
आला पिकाले बहार झाली शेतामधी दाटी
कसे वा-यानं डोलती दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी देव अजब गारोडी !
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
पेरनी by बहिणाबाई चौधरी
पेरनी पेरनी आले पावसाचे वारे बोलला पोपया पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!
पेरनी पेरनी आभायात गडगड, बरस बरस माझ्या उरी धडधड!
पेरनी पेरनी आता मिरुग बी सरे. बोलेना पोपया पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!
पेरनी पेरनी अवघ्या जगाच्या कारनी. ढोराच्या चारनी, कोटी पोटाची भरनी.
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
जीव by बहिणाबाई चौधरी
जीव देवानं धाडला जल्म म्हणे 'आला आला' जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे 'गेला गेला'
दीस गेला कामामधी रात नीजमधी गेली मरणाची नीज जाता जलमाची जाग आली
नही सरलं सरलं जीव तुझ येन जान जसा घडला मुक्काम त्याले म्हनती रे जीन
आला सास, गेला सास जीव तुझं रे तंतर अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर!
येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप काम करता करता देख देवाजीच रूप
ऐक ऐक माझ्या जीवा पीडयेलाच कण्हणं? देरे गांजल्याले हात त्याच ऐक रे म्हनन
अरे निमानतोंडयाच्या वढ पाठीवर्हे धांडा नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झालझेंडा
हास हास माझ्या जीवा असा संसारात हास इडा पीडा संकटाच्या तोंडावर्हे काय फास
जग जग माझ्या जीवा असा जगणं तोलाच उच्च गगनासारख धरीत्रीच्या रे मोलाचं
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
माझी माय सरसोती by बहिणाबाई चौधरी
माझी माय सरसोती माले शिकवते बोली लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !!
माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता --भागवत पावात समावत आणि मातीमधी उगवत !!
आरे देवाचं दर्सन झालं झालं आप०सुक हिरीदात सुर्याबापा दाये अरूपाच रूप !!
तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी देवा तुझ येनजान वारा सांगे कानामधी !!
फुलामधी समावला धरत्रीचा परमय माझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय !!
किती रंगवशी रंग रंग भरले डोयात माझ्यासाठी शिरिरंग रंग खेये आभायात !!
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
अश्शि कश्शि येळि वो माये by बहिणाबाई चौधरी
आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?
बारा गाडे काजळ कुंकू पुरल नहीं लेनं
साती समदुराचं पानी झालं नही न्हानं
आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?
धरतीवरलं चांदी सोनं डागीन्याची तूट
आभायाचं चोयी लुगडं तेभी झालं थिटं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
इडा पिडा संकटाले देल्हा तूनें टाया
झाल्या तुझ्या गयामंधीं नरोंडाच्या माया
आशी कशी येळी व माये , आशी कशी येळी?
बरह्मा इस्नू रुद्र बाळ खेळईले वटीं
कोम्हायता फुटे पान्हा गानं आलं व्होटीं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
नशीबाचे नऊ गिर्हे काय तुझ्या लेखीं?
गिर्ह्यानाले खाईसनी कशी झाली सुखी ?
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
नऊ झनासी खाउन गेली सहज एक्या गोष्टी
दहाव्याशी खाईन तेव्हां कुठें राहिन सृष्टीं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
मानूस by बहिणाबाई चौधरी
मानूस,
मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा
गायम्हैस देते दूध
मतलबासाठीं
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठीं
कुत्रा शेंपूट हालये
मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
करमाची रेखा by बहिणाबाई चौधरी
लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली
देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला
बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या
अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले
राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन त्यात आले रे नशीब काय सान्गे पंचागन
नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
हिरीताच देन घेन by बहिणाबाई चौधरी
नको लागू जीव, सदा मतलबापाठी,
हिरीताच देन घेन नाही पोटासाठी
उभे शेतामधी पिक
ऊन वारा खात खात
तरसती केव्हा जाउ,
देवा, भुकेल्या पोटात,
पेटवा रे चुल्हा आता, मान्डा ताटवाटी,
नको लागू जीवा सदा मतलबापाठी
पाहीसनी रे लोकाचे,
यवहार खोटे नाटे
तव्हा बोरी बाभयीच्या
आले आन्गावर काटे
राखोयीच्यासठी झाल्या शेताले कपाटी,
नको लागू जीवा सदा मतलबापाठी
किती भरला कनगा
भरल्यान होतो रिता
हिरिताच देन घेन
नही डडोरा करता
गेली देही निन्धीसनी नाव रे शेवटी
नको लागु जीवा सदा मतलबापाठी
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
वाटच्या वाटसरा by बहिणाबाई चौधरी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी
नशीबी दगड गोटे
काट्या कुट्याचा धनी
पायाले लागे ठेचा
आलं डोयाले पानी
वरून तापे उन
आंग झालं रे लाही
चालला आढवानी
फ़ोड आले रे पायी
जानच पडीन रे
तुले लोकाच्यासाठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
दिवस ढयला रे
पाय उचल झट
असो नसो रे तठी
तुझ्या लाभाची गोट
उतार चढनीच्या
दोन्हि सुखादुखात
रमव तुझा जीव
धीर धर मनात
उघडू नको आता
तुझ्या झाकल्या मुठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
' माझेज भाऊबंद
घाईसनी येतीन !'
नको धरू रे आशा
धर एव्हढं ध्यान
तुझ्या पायाने जानं
तुझा तुलेच जीव
लावनी पार आता
तुझी तुलेच नाव
मतलबाचे धनी
सर्वी माया रे खोटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
वार्याचं वाहादन
आलं आलं रे मोठं
त्याच्यात झुकीसनी
चुकू नको रे वाट
दोन्ही बाजूनं दर्या
धर झुडूप हाती
सोडू नको रे धीर
येवो संकट किती
येऊ दे परचिती
काय तुझ्या ललाटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
माझी मुक्ताई by बहिणाबाई चौधरी
माझी मुक्ताई मुक्ताई
दहा वर्साच लेकरू
चान्गदेव योगियान
तिले मानला रे गुरू
देख ग्यानियाच्या राजा,
आदिमाया पान्हावली
सर्व्याआधी रे मुक्ताई
पान्हा पियीसनी गेली..
अरे सन्याशाची पोर
कोन बोलती हिनई
टाकीदेयेल पोरान्च
कधी तोन्ड पाहू नही..
अरे अस माझ तोन्ड
कस दावू मी लोकाले?
ताटी लावी ग्यानदेव
घरामधी रे दडले !
उबगले ग्यानदेव
घडे असन्गाशी सन्ग,
कयवयली मुक्ताई
बोले ताटीचे अभन्ग..
घेता हिरीदाचा ठाव
ऐका ताटीचे अभन्ग
एका एका अभन्गात
उभा केला पान्डुरन्ग..
गह्यरले ग्यानदेव
डोये गेले भरीसन
असा भाग्यवन्त भाऊ,
त्याची मुक्ताई बहीन...
🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
बहिणाबाई चौधरी यांच्या कविता तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही Bahinabai chowdhary Marathi Kavita or marathi poem मराठी कविता आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद !
खूप सुंदर संग्रह आहे
उत्तर द्याहटवाखूप सुंदर संग्रह आहे
उत्तर द्याहटवा